लेणी/ गुहा/ पठारे

लेणी/ गुहा/ पठारे

लेणी/ गुहा/ पठारे

 • मसाई पठार

  पन्हाळ गडाच्या पश्चिमेस सुमारे ८ किमी पायी चालण्याच्या अंतराव इतिहासाच्या वारसा सांगणारे मसाई पठार आहे. येथे गाडीमार्गे जाण्यासाइी पन्हाळ्याच्या बुधवार पेठेतून या मार्गे जावे लागते. या पठारावर गेल्यावर विस्तीर्ण असा सपाट भाग दिसतो. जांभ्या खडकांतील या पठारांची रुंदी ३०० ते ८०० फुट असून सभोवती ५०० ते ६०० फुट खोल दरी आहे. पठाराचे एकूण क्षेत्र जवळपास ९०० एकर आहे. पठारावर मसाईदेवीचे मंदिर असून या देवीवरुनच या पठाराला मसाईपठार हे नाव पडले असे मानतात.

  पावसाळ्यात या पठाराच्या पाचगणीच्या टेबललँडपेक्षाही अधिक सौंदर्य दिसते. अव्दितीय असा हा परिसर सभोवतालच्या द-या व त्यातून वाहणा-या कासारी आणि वारणेच्या अनेक ओढ्याच्या खो-यामुळे अतिशय देखणा दिसतो.

  इतिहासात छ. शिवराय पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका होवून या पठारावरुनच मसाई देवीचे दर्शन घेवून विशाळगडाकडे रवाना झाले होते. म्हाळुंगे गावामार्गे या पठारावर येत असताना राजश्री छ. शाहू महाराजांनी चहाची लागवड केलेल्या चहाच्या मळा लागतो. या मळ्यातील चहा इंग्लंडमध्ये पन्हाळा फोर्ट टी म्हणून प्रसिध्द होता तर अशा या पठाराला मस्त निवांतपणा अनुभवण्यासाठी नक्की भेट द्यावी.  *कसं जायचं - कोल्हापूर शहर - बुधवार पेठ (पन्हाळा) - मसाई पठार (३० किमी.)

 • मसाई लेणी

  मसाई पठारावर मसाई देवी मंदिराच्या उत्तरेला अर्धवर्तळाकार कड्यामध्ये बौध्दकालीन लेणी आहेत. येथील गुहेतून पाणी वाहत असल्याचा आवाज येतो. या लेणी दुस-या ते तिस-या शतकाच्या दरम्यानच्या आहेत.

  या ठिकाणी दोन मोठ्या व तीन लहान गुहा असून एक भुयारी मार्ग आहे. मोठ्या गुहेत एक पडवी, एक मोठे माजघर व आतमध्ये एक छोटी खोली असून गोलाकार स्तूप आहे. यावरील छत सपाट आहे. जांभ्या दगडातील या गुहा ओंबडधोबड स्वरुपात खोदल्या आहेत. या ठिकाणी असणारा भुयारी मार्ग मसाई देवळाखालून बाहेर जातो. हा मार्ग अनेक गुहांनी बनला आहे. गुहा पर्यटनांच्या दृष्टीने हे ठिकाण महत्वाचे आहे.  कसं जायचं - कोल्हापूर शहर - बुधवार पेठ (पन्हाळा) मसाई पठार - मसाई लेणी (५० किमी)

 • बौध्दकालीन पोहाळे लेणी

  कोल्हापूरापासून उत्तरेला जोतीबा डोंगराच्या पायथ्याशी पोहाळे गावाजवह जांभ्या दगडात खोदलेल्य उत्कृष्ट गुहा आहेत. ही लेणी पाच विभागत कोरलेली असून लेण्याच्या डाव्या बाजूस दोन नैसर्गिक झरे आहेत. झ-यांच्या उजव्या बाजूस १० फुट लांबी रुंदीच्या दोन खोल्या आहेत. दोन तीन चैत्यगृह, पाठशाळा आणि कांही खोल्या असा गुहांच्या परिसर असून गुहेमध्ये प्रचंड गारवा अनुभवता येतो. पावसाळ्यात गुहेच्या वरील भागातून हलका धबधबा कोसळू लागतो तेंव्हा अधिक आकर्षक असे वातावरण इथे तयार होते. तर अशा डोंगराळ खोदलेल्या भव्य गुंफांना पर्यटकांनी आवर्जुन भेट द्यावी  कसं जायचं -कसं जायचं –कोल्हापूर शहर - पंचगंगा नदी पुल ओलांडून पुढे डाव्या हाताच्या पेट्रोलपंपापासून उजव्या हातास वळण - वडणगे - निगवे - पोहाळे - पोहाळे लेणी (१५ किमी)

 • अखंड खडकातील अप्रतिम गुंफास्थान, पळसंबे लेणी

  कोल्हापूर गगनगड मार्गावर सुमारे ४० ते ४५ किमी अंतरावर आसळज गावाच्या थोडं पुढे पळसंबे गावाचा फाटा लागतो. तेथून आत साधारणतः १५ मिनीटात आपण पळसंबे लेणी येथे पोहचतो. इथे एक गगनगिरी महाराजांचा आश्रम पण आहे. इथून पुढेच आपणांस खाली उतरण्यासाठी पाय-या दिसतात. या पाय-यावरुन खाली उतरल्यावर जे काही दृश्य दिसते ते केवळ अवर्णनीयच आहे. इथलं वातावरण अतिशय लोभसवाण वाटतं.

  पावसाळ्यात इथे दाजीपूरच्या जंगलातून वाहत आलेला खळखळता ओढा लागतो. इथे उजव्या बाजुला अखंड पाषाणात खोदलेलं मंदिर दिसतं. मंदिरात मुर्ती नाही पण मंदिर खुपच देखणं आहे. ओढ्याच्या दुस-या बाजूला काठाववर एक गुहा दिसते हि गुहा लांब असू कातळ भिंतीवर ओळीने खोदलेल्या स्तुपांच्या छोट्या प्रतिकृती येथे पहायला मिळतात. गुहेच्या गर्भगुहात महादेवाचे शिवलिंग असून त्याच्यावर सतत पाणी पडत असते. येथील पाणी पिण्यास योग्य आहे.

  गुहेतून बाहेर येऊन पहिल्या अखंड पाषाण मंदिराजवळ यायचं व त्याच्या मागील बाजूस जायचं तेथे मोठा खडक असून त्या खडकात वर चढण्यासाठी खाचा दिसतात. पावसाळ्यानंतर ओढ्याच्या प्रचंड प्रवाहामुळे चढाईस आव्हान निर्माण होते त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी थोडं बेतानचं. पहिल्या मंदिराच्या मागुन चढाई करुन वर गेल्यावर तिथून थोडे पुढे गेल्यावर आणखीन दोन अखंड पाषाणातील जांभ्या दगडातील मंदिरे दिसतात हे दृश्य म्हणजे पैसा वसुलच आहे.

  ओढ्यातील गुहा, तीन अखंड पाषाण मंदिरे पाहून आपण थक्क होऊन जातो. कोल्हापूरातून गगनबावडा मार्गावर जाणार असाल तर या ठिकाणी जरुर भेट द्या एक वेगळाच आनंदा मिळेल.

  *टिप - या ओढ्यातून वाहणा-या जोरदार प्रवाहामुळे शक्यतो उन्हाळ्यात किंवा पर्जन्यकाळ ओसरल्यावर या लेण्यास भेट देणे योग्य ठरेल.  *कसं जायचं - कोल्हापूर शहर - गगनबावडा रोड - आसळज - पळसंबे - पळसंबे लेणी (५० किमी.)

 • मोरजाई गुंफा

  मोरजाई पठारावर पोहचल्यावर काही अंतर चालल्यावर लांबून आपणांस मोरजाई गुंफा परिसर दिसतो. जवळ पोहचल्यावर अनेक अवशेष पाहता येतात. जांभा दगडातील दिपमाळसदृश्य तसेच समाधीसदृश्य खडक पाहायला मिळतो. बाजूलाच एक पाण्याचे टाके सुध्दा आहे. गुहेत प्रवेश केल्यावर मस्त गारवा जाणवतो. या गुहेत मोरजाई देवीचे मंदिर आहे. ही गुहा मुख्य असून सर्वात मोठी आहे. इथे आपणांस काही खांब पहायला मिळतात. तसेच एका ओळीने ठेवलेले वीरगळ तसेच सतीशिला व इतर शिल्पकृती पहायला मिळतात. मुख्य गुहेच्या पुढे आणखीन एक छत पडलेली गुहा असून बाजूला अजुन काही छोट्या गुहा आहेत.  *कसं जायचं - कोल्हापूर शहर - गगनबावडा रोड - सांगशी गाव - बोरबेट - मोरजाई पठार

 • अप्रतिम जांभा दगडांचा सडा - मोरजाई पठार

  मोरजाई पठाराची माहिती मिळाल्यावर मोरजाई पठार म्हणजे काय असेल याची माहिती नव्हती. ज्यावेळी मोरजाई पठाराजवळ पोहचलो त्यावेळी काही पाय-या व पुढे थोडी चढण चढून जावे लागले. थोडीसी दमछाक करणारी चढण चढून ज्यावेळी आम्ही पठारावर आलो त्यावेळी आवाकच झालो. एैन उन्हाळ्यातसुध्दा हे पठार अतिशय सुंदर दिसत होतं ते तेथील जांभ्या दगडाच्या सड्यामुळे असं वाटत होत की छोट्या छोट्या दगडांचा पाऊस पडला होता.

  पठारावरुन लखमापूर डॅमचं सुंदर दृश्य पाहता येतं तसेच आजुबाजुची शेती, जंगल परिसरसुध्दा मस्तच वाटतो. पठारावर पोहचताच एक छोटीशी सुंदर दगडी कमान आपलं मनोभावे स्वागत करते पुढे आणखिन एक कमान दिसते. इथुन पुढे काही अंतरावर आपणांस मोरजाई गुहा दिसतात, खुपच सुंदर दृश्य आहे हे. पहाल तिकडे फक्त दगडांचा सडाच दिसतो. मनाला भावणारे पठार आहे हे. इथे रात्रीच्यावेळी अवकाशनिरीक्षणासाठी हे पठार योग्य आहे असे मानले जाते.  *कसं जायचं - कोल्हापूर शहर - गगनबावडा रोड - सांगशी गाव - बोरबेट - मोरजाई पठार