कोल्हापुर

कोल्हापुर

  • क्षेत्रफळ: ६६.८२ चौ. किमी
  • उंची: ५६९ m (१,८६७ ft)
  • लोकसंख्या:(महाराष्ट्रात ९वा क्रमांक) (२०११)
  • पिन कोड: ४१६ ००१

माझं कोल्हापूर, आपलं कोल्हापूर

जगात भारत देश, भारतात महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा हा ख-या अर्थाने पर्यटनाची राजधानी आहे. कोल्हापूर हे शाहुनगरी, कलानगरी, करवीर नगरी, क्रिडा नगरी, कुस्तीची पंढरी, करवीर काशी अशा अनेक बिरुदावल्यांनी ओळखली जाते. कोल्हापूर जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटन आहे की ती एक पर्यटनगरी ठरेल.

प्राचीन, धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, पर्यावरणीय आणि भौगोलिक विविधतेने कोल्हापूरचे पर्यटन नटलेले आहे. इथे प्राचीन, मध्ययुगीन तसेच आधुनिक कालखंडातील विविध राजवटींच्या इतिहासाचा वारसा पहायला मिळतो. कोल्हापूर हा भाग हिरवागार टवटवीत निसर्ग, संपन्न पशुपक्षी व वन्यप्राणी जीवन, वळवळणाने वाहणारी लोभस नदीपात्रे, लाल मातीच्या सुंदर पायवाटा, प्राचीन गुंफा मंदिरे, मठ, वास्तू, गडकोट, किल्ले, घाट, तलाव, नैसर्गिक झरे, धबधबे, धरणे, विस्तीर्ण पठारे तसेच घनदाट अरण्यांनी संपन्न आहे. त्यामुळेच इथे भेट देणा-या प्रत्येक पर्यटकाला कोल्हापूरला दिलेली भेट अविस्मरणीय वाटते. म्हणून तर "जगात भारी आम्ही कोल्हापुरी" हे वाक्य इथे सार्थक ठरतं.


थोडक्यात इतिहास

इतिहासकारांच्या मतानुसार मूळ ब्रह्मपूरी या गावाचा विस्तार होऊन आजचे कोल्हापूर बनले आहे. प्राचीन काळी या भागावर चालूक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, देवगीरीचे यादव व बहामणी या राजवटींनी आपले क्षेत्र विस्तारण्याचा प्रयत्न केला. इ.स. १६५९ मध्ये छ. शिवरायांनी पन्हाळा जिंकून स्वराज्यात आणला. पुढे कोल्हापूर परिसर जिंकून घेतला.

छ. शिवरायांचे इ.स. १६८० मध्ये देहावसान झाले तेंव्हा छ. संभाजी राजेंनी पन्हाळ्यावरुन काही काळ स्वराज्याची सूत्रे हालवली. छ. संभाजी राजेंच्या मृत्यूनंतर छ. शिवरायांचे दुसरे पुत्र छ. राजाराम १६८९ च्या सुमारास गादीवर आले. पूढे छ. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर इ.स. १७०० ते १७०७ या काळात त्यांची पत्नी महाराणी ताराबाई यांच्याकडे स्वराज्याची सुत्रे आली.

महाराणी ताराबाई शूर, मूत्सदी करारी स्त्री होत्या. प्रसंगी घोड्यावर मांड ठोकून महाराणी ताराबाई लढाईत भाग घेत होत्या. मोघलांविरुध्दांच्या लढ्यात इ.स. १७०० ते इ.स. १७०७ या निर्णायक पर्वात मुख्य भुमिका वठवली ती महाराणी ताराबाईंनी. ताराराणींच्या काळात मराठ्यांना हरवणे बलाढ्य मुघल साम्राज्याला जमले नाही. या महत्वाकांक्षी आणि मुत्सदी महाराणींचे १० डिसेंबर १७६१ रोजी साता-यात वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी देहावसान झाले.

कोल्हापूरात छत्रपतिंच्या कारकिर्दीत महाराणी ताराबाई पुत्र छ. शिवाजी त्यांच्यानंतर छ. संभाजी राजे यांनी इ.स. १७१४ ते इ.स. १७६० पर्यंत ४६ वर्षे राज्य केले. यापुढे शिवाजी महाराज (दुसरे) , संभाजीराजे ऊर्फ आबासाहेब, शहाजीराजे ऊर्फ बुवासाहेब पुढे छ. शिवाजी (तिसरे) ऊर्फ बाबासाहेब यांचा १८६६ मध्ये मृत्यू झाला. मृत्युपुर्वी तीनच दिवस आधी त्यांनी आपल्या बहिणीच्या नागोजीराव पाटणकर या मुलाला दत्तक घेतले हे म्हणजेच कोल्हापूरच्या छ. शाहू महाराजंचे दत्तक आजोबा छत्रपती राजाराम महाराज होत. हे छत्रपती राजाराम महाराज परदेशाहून परत येत असताना फ्लॉरिन्स शहरात ३० नोव्हेंबर १८७० रोजी अचानक मृत्यू पावले.

छ. राजाराम महाराजांना पुत्र नसलेने त्यांच्या गादीवर बसविण्यासाठी २३ ऑक्टोबर १८७१ रोजी सावर्डेकर भोसले घराण्यातील साडेआठ वर्षे वयाचा मुलगा नारायण दिनकरराव भोसले यास दत्तक घेतले हे करवीरचे चौथे छ. शिवाजी महाराज होत. या छ. शिवाजी महाराजांना ब्रिटीशांनी वेडे ठरवून त्यांचा छळ केला. कॅप्टन ग्रीन साहेबाने त्यांना पोटात लाथ मारलेने पोटातील प्लीहा फुटून त्यांचा दुःखद मृत्यु झाला.

१७ मार्च १८८४ रोजी चौथ्या शिवाजी महाराजांच्या विधवा पत्नी आंनदीसाहेब यांनी कागलचे यशवंतराव घाटगे यांना समारंभपूर्वक दत्तक घेतले. अशा रितीने कागलचे यशवंतराव कोल्हापूरचे छत्रपती शाहू बनले. छ. शाहू महाराजांनी १८९४ ते १९२२ या काळात अनेक लोककल्याणकारी व उत्कृष्ठ कामे करुन लोकराजा म्हणून नावलौकीक मिळविला. छ. शाहू महाराजांचा देहांत ६ मे १९२२ रोजी मुंबईत खेतवाडी येथे झाला.

छ. शाहूनंतर त्यांचे पुत्र छ. राजाराम महाराज गादीवर आले. त्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन अनेक समाजसुधारणेची व प्रजाहिताची कामे उत्कृष्ठरित्या राबविली. १९४० साली त्यांचे निधन झाले.छ. शाहूनंतर त्यांचे पुत्र छ. राजाराम महाराज गादीवर आले. त्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन अनेक समाजसुधारणेची व प्रजाहिताची कामे उत्कृष्ठरित्या राबविली. १९४० साली त्यांचे निधन झाले.

१ जुन १९४७ रोजी देवास घराण्यातील विक्रमसिंह पवार यांचा दत्तकविधी होऊन ते छत्रपती शहाजी महाराज म्हणून कोल्हापूरच्या गादीवर आले. छ. शहाजी महाराज कोल्हापूरचे शेवटचे अभिषिक्त छत्रपती ठरले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक प्रजाहिताची कार्ये करुन प्रजाजनांना लोकशाहीचे हक्क प्रदान केले. १ मार्च १९४९ रोजी कोल्हापूर संस्थानही भारतात विलीन झाले.

सध्या छ. शाहू महाराज, युवराज छ. संभाजीराजे भोसले व युवराज छ. मालोजीराजे भोसले हे शिवजयंती, छ. शिवाजी महाराज व महाराणी ताराबाई रथोत्सव, शिवराज्यांभिषेक तसेच दसरा महोत्सव, छ.शाहू जयंती, छ.शाहू पुण्यतिथी इत्यादी अनेक कार्यातून समाजहिताची कामे करत आहेत.