धार्मिक पर्यटन

धार्मिक पर्यटन

शहरांतर्गत मंदिरे

 • आई अंबाबाई मंदिर

  महाराष्ट्रामधील प्रमुख देवतांमध्ये अंबाबाईचं नाव घेतलं जात. भारतातील बारा शक्तीपिठांपैकी एक संपूर्ण पिठ म्हणून कोल्हापूरची अंबाबाई पूर्ण भारतात प्रसिध्द आहे. मंदिर इतकं देखणं आहे की इथे येताच क्षणीच एक आत्मिक आनंद मिळतो. मंदिराच आवार स्वच्छ आहे. मंदिरावरील शिल्पकला अजोड आहे. अत्यंत भव्य व सुंदर हेमांडपंथी शैलीचे हे मंदिर म्हणजे प्राचीन शिल्पकलेचा उकृष्ट नमुनाच आहे. आजुबाजुला पाहिल्यास ब-याच ठिकाणी शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुने पहायला मिळतात. घाटी दरवाज्याजवळील नवग्रह मंडप तर सर्वांनी एकदा न चुकता पहावा असाच आहे, या मंडपाच्या छतावरील कलाकृती केवळ विलोभनीय मंदिरात प्रवेशासाठी चार दिशेला चार प्रवेशव्दार आहेत तसेच मंदिराच्या सभोवताली अंबाबाईचा चांदीचा रथ तसेच दत्त मंदिर, गणेश मंदिर इत्यादी जवळपास ३० हून अधिक छोटी मोठी देवालये आहेत त्यामुळे हे स्थान अतिशय पवित्र मानले जाते.

  अंबाबाईचा नवरात्र उत्सव प्रसिध्द आहे. येथे नऊ दिवसात देशभरातून लाखो भाविक अंबाबाईचे दर्शन घेतात. कार्तिक व माघ महिन्यात तीन दिवसांचा किरणोत्सव सोहळा सुध्दा भाविकांमध्ये लोकप्रिय आहे. चैत्र महिन्यात कृष्ण प्रतिपदेला अंबाबाईच्या मंदिरात रथोत्सव साजरा केला जातो. राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी चैत्र महिन्यात सामाजिक सुधारणेच्या दृष्टीने रथोत्सव सुरु केला जेणेकरुन अंबाबाईची उत्सवमुर्ती सजलेल्या रथातून बाहेर येईल व असंख्य भाविकांना तिचे दर्शन घेता येईल या दिवशी रथाच्या मार्गावर आकर्षक रांगोळी काढून तसेच फुलांच्या पायघड्या घालून अंबाबाईचे स्वागत करण्याची परंपरा आहे.

  * कसं जायचं- मुख्य बसस्थानक - दसरा चौक - बिंदू चौक - आई अंबाबाई मंदिर(०३ किमी)

 • विठ्ठल मंदिर व परिसर

  अंबाबाई मंदिरापासून हाकेच्या अंतरावरील हे मंदिरसुध्दा देखणं आहे. अनेक मंदिराच्या समुहातून हा परिसर नटलेला आहे. मंदिराची थोडी पडझड झाली असली तरी अंबाबाईच्या समकालीन हे मंदिर आहे त्यामुळे याला महत्व आहे. शिखरांची रचना सुंदर आहे. तसेच बाहेरील बाजूस उत्तम शिल्पकृती कोरल्या आहेत. मंदिराच्या आतील बाजूससुध्दा सुंदर शिल्पकृती पहायला मिळतात. ओंकारेश्वर मंदिराच्या गाभा-याची चौकटीवरील नक्षीकाम तर सुंदर व सुबक आहे. त्याशिवाय इथे नवग्रह मंदिर एकमुखी दत्त तसेच आजुबाजूला काही दगडी मुर्त्या इथे दिसतात. अंबाबाई मंदिराच्या समकालीन या मंदिराला एकदा भेट द्यायलाच हवी.

  * कसं जायचं- मुख्य बसस्थानक- व्हिनस कार्नर – ख़ासबाग मैदान – मिरजकर तिकटी – विठ्ठल मंदिर (३ किमी)

 • कैलासगडची स्वारी

  विठ्ठल मंदिरापासून जवळच असलेल्या मंगळवार पेठेत अरुंद बोळातून आत गेल्यावर मंदिराचे देखणे व आकर्षक रुप पहायला मिळते. कलायोगी जी कांबळे यांच्या दुरदृष्टीतून १९७२ मध्ये मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला. मुख्य शिवलिंग भोवती मंदिर सजिवण्यात आले. मंदिरामध्ये जी. कांबळे यांची छ. शिवाजी महाराज राज्याभिषेक, शिवाचे ध्यान, समुद्गमंथन, तांडवनृत्य, गणेश अशी चित्रे या मंदिरात पहावयास मिळतात तसेच मंदिराबाहेर भव्य पितळी नंदी व दोन्ही बाजुला भव्य पितळ्या समयांमुळे मंदिराचे सौंदर्य खुलून दिसते.

  * कसं जायचं- मुख्य बसस्थानक- व्हिनस कार्नर – ख़ासबाग मैदान – कैलासगडची स्वारी मंदिर (३ किमी)

 • जिल्ह्यातील सर्वात मोठी पिंड असलेले उत्तरेश्वर महादेव

  कोल्हापूर शहरातील उत्तरेश्वर पेठेत हे महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण ठरते ते येथील मोठ्या महादेवाच्या पिंडीमुळे. पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात इतकी मोठी पिंड कोठेही पहावयाला मिळत नाही. सध्याची पिंडीची उंची व रुंदी साधारणतः ५ इंच बाय ५ इंच आहे. पण स्थानिकांच्या माहितीनुसार एवढ्याच आकाराचा पिंडीचा भाग जमिनीखाली आहे म्हणजे ही पिंड १० ते १२ फुट उंचीची होईल.

  *कसं जायचं - मुख्य बसस्थानक - दसरा चौक - बिंदू चौक - छ. शिवाजी चौक - गंगावेश - उत्तरेश्वर पेठ, वाघाची तालीम - उत्तरेश्वर महादेव मंदिर, ३ किमी

 • निसर्गरम्य कात्यायनी मंदिर

  कोल्हापूरपासून साधारणतः ९ किमी वर दक्षिणेकडे गारगोटी रस्त्याच्या बाजूला डोंगरावर हे छोटे खानी मंदिर असून याचा परिसर निसर्गरम्य आहे. अतिशय देखणा परिसर या मंदिराला लाभला आहे. मंदिरात प्रवेश करताच एक कुंड असून त्यास अमृतकुंड म्हणतात तसेच मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूस आणखिन एक कुंड असून त्यास परशुराम कुंड म्हणतात. थोडक्यात शहरापासून थोडच दूर निसर्गरम्य वातावरणात या मंदिराला दिलेली भेट ही अनोखी ठरते.

  *कसं जायचं - कोल्हापूर शहर - कळंबा गाव-२ किमी वर डाव्या हातास फाटा - कात्यायनी मंदिर

 • लोकप्रिय कणेरी मठ

  कणेरी मठ हे एक पर्यटकाचं आवडतं डेस्टीनेशन आहे. या ठिकाणी तुम्ही कुटुंबासोबत पूर्ण दिवस मजेत जगु शकता. इथे पुरातन मंदिर, शॉपिंग हाऊस, मुलांसाठी खेळ व सर्वात आकर्षणाचा बिंदु म्हणजे इथले ग्रामीण भागातील गावगाडा पूर्वी कसा चालत असे याच शिल्परुपी म्युझियम तसेच आरोग्य उद्यानासारखे उपक्रम मस्तच आहेत.

  १४ व्या शतकातील लिंगायत समाजाच्या धर्मगुरुंनी इथे शिवलिंगाची स्थापना केली आहे. येथील मुळ मंदिर हेमांडपंथी असून परीसरात इतर मंदिरे आहेत. या शिवमठाचे लाखो भक्त महाराष्ट्र व कर्नाटक तसेच इतर भागात पसरले आहेत. महाशिवरात्रीला इथे मोठा उत्सव भरतो.

  *कसं जायचं - कोल्हापूर शहर - कळंबा गारगोटी रोड- कळंबा गावापासून २ किमी वर डाव्या हातास फाटा - कात्यायनी मंदिर (१३ किमी)

 • पाच नद्यांचा संगम - प्रयाग

  कोल्हापूर शहरापासून थोड्याच अंतरावरील चिखली गावाजवळ हा संगम आहे. येथे कुंभी, कासारी, धामणी, तुळशी व भोगावती या नद्यांच्या प्रवाहापासून पंचगंगेची निर्मिती होते. त्यामुळे हे स्थान पवित्र मानले जाते. इथला परिसर मात्र निसर्गरम्य आहे. मोठमोठी झाडे, पक्ष्यांचा किलबिलाट, बाजूलाच वाहणारे नदीचे पाणी तसेच इथे असणा-या मंदिरामुळे खुप मस्त वाटंत. इथे मंदिराला लागून एक मोठा दगड ठेवला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार तो नवग्रह कोरलेला दगड आहे. तोही पाहण्यासारखा आहे.


  *कसं जायचं-कोल्हापूर शहर-पंचगंगा पुल ओलांडणे-चिखली गाव-प्रयाग संगम(६किमी)

 • ऐतिहासिक कल्लेश्वर मंदिर

  कोल्हापूर शहरापासून थोड्याच अंतरावरील चिखली गावाजवळ हा संगम आहे. येथे क

  कोल्हापूरच्या नेऋत्येस १४ किमी अंतरावर शिलाहारकालीन कसबा बीड गाव वसले आहे. तिथेच ऐतिहासिक कल्लेश्वर महादेवाचे मंदिर आहे. मंदिरात प्रवेश केल्याक्षणिच मंदिराच्या एकुण दिसण्यावरुन मंदिर प्राचीन वाटते. मंदिराचा आवार प्रशस्त असून आजुबाजूला अनेक शिल्पे, वीरगळ आपणांस पहायला मिळतात. येथील दिपमाळ पाहण्यासारखी आहे. या दिपमाळेच्या बाजूलाच प्रथमदर्शनी तुळशी वृंदावनासारखा दिसणारा स्तंभ वीरगळसुध्दा लक्ष देऊन पाहण्यासारखा आहे.

  कल्लेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर येथून थोड्यात अंतरावरील बहिरेश्वर गावातील शेषशायी मंदिराला भेट देता येईल हे मंदिर तलावाच्या मधोमध असून येथील होयसळ शैलीतील शेषशाई विष्णूची मुर्ती अप्रतिम आहे.

  *कसं जायचं- कोल्हापूर शहर- बालिंगा – कसबा बीड (१७ किमी)

 • शहराबाहेरील मंदिरे

 • लोकदेवता जोतीबा

  पूर्वी छोटा चौथरा असलेले हे मंदिर ग्वाल्हेर संस्थानाचे महाराज राणोजीराव शिंदेनी १७३० मध्ये बांधले आहे. मंदिरासाठी काळ्या पाषाणाचा अतिशय उत्कृष्टपणे वापर केला आहे. पाषाणावर वेगवेगळ्या सुंदर कलाकृती कोरलेल्या दिसून येतात. मंदिर अतिशय देखणे आहे. सर्वत्र गुलालाची उधळण झाली असल्याने संपूर्ण मंदिर परिसर गुलालमय दिसतो. येथील दक्षिण - दरवाज्याजवळील दिपमाळ पाहण्यासारखी आहे. मंदिरातील वातावरण अतिशय आल्हाददायक वाटतं. खुप छान वाटतं. जोतीबा हा देव लोकदेवता म्हणून प्रसिध्द आहे. चैत्र पौर्णिमेला इथे यात्रा भरते. संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकातूनसुध्दा येथे भाविकांची गर्दी होते. सासनकाठ्यांचा खेळ तर अचंबीत करणाराच वाटतो. मुख्य मंदिरापासून पाच ते दहा मिनिटांवर यमाई देवीचे मंदिर आहे. इथे जाताना उजव्या हाताला एक गुहा लागते तिथे गणपती देवता आहे या गुहेतील गारवा अनुभवण्यासारखाच आहे. इथून पुढे १० किमी वरील पन्हाळा तसेच पावनगड किल्ल्याला भेट देऊ शकता.

  *कस जायचं - कोल्हापूर शहर - केर्ली फाटा, ८ किमी - जोतीबा

 • भव्य कासवरुपी मंदिर - पैजारवाडी

  श्री दत्त गुरु चिले महाराजांची इथे समाधी असून येथील कासवरुपी मंदिर अगदी वैशिष्टपूर्ण वाटते. मंदिराच्या आत गेल्यावर शांतता जाणवते. मंदिराच्या भिंतीवरील फळ्यांवर लिहिलेले सुविचार वाचून मन प्रफुल्लीत होत. मंदिराच्या मधोमध चिले महाराजांची समाधी आहे.
  *कस जायचं - कोल्हापूर शहर - मलकापूर रोड - पैंजारवाडी (२५ किमी)

 • निसर्गरम्य धोपेश्वर

  कोल्हापूरातील शाहूवाडी तालूक्यात हे छोटेसे पण छान मंदिर आहे. या मंदिराला जाण्यासाठी मलकापूरातून आंबाच्या रोडकडे किमी जाऊन डाव्या हाताला वळण घ्यावे व पूढे ३ किमी वर धोपेश्वर मंदिर लागते. मंदिराची वाट निसर्गरम्य आहे. आजूबाजूला शेती, झाडी पाहत, पक्षांचा किलबिलाट ऐकत आपण कधी पोहचलो हे कळत देखील नाही. मंदिर छोटेसे असून पूढे दरी व घनदाट जंगल तर मागे धबधबा आहे. पावसाळ्यानंतर आपण येथे भेट दिल्यास विहंगम असे दृश्य पहावयास मिळते.  *कसं जायचं- कोल्हापूर शहर - मलकापूर रोड- साधारणत: ४ ते ५ किमी जाऊन डाव्या हाताला वळण- धोपेश्वर (५६ किमी km)

 • स्वयंभू रामलिंग गुंफा मंदिर

  कोल्हापूर हातकणंगले रोडवर २० किमी वर डाव्या हाताला या मंदिाकडे जायला वाट आहे. हे मंदिर छोटखाणी असून गुंफा मंदिर आहे. एका गुहेत महादेवाच्या पिंडीवर पाणी पडते. इथे मंदिराच्या गाभा-त दोन नंदी पहायला मिळते. हे इथले वैशिष्ट्य आहे. मंदिराला लागूनच गुहेतील पाणी साचून एक कुंड तयार झाले आहे. रामलिंग हे निसर्गरम्य वातावरणात आहे त्यामुळे आपणसुध्दा इथे रमून जातो. येथून आपण आलमप्रभूंना भेट देऊ शकतो.  *कसं जायचं- कोल्हापूर शहर- कोल्हापूर शहर- सांगली फाटा - हातकणंगले रोड - रामलिंग मंदिर- (२६ किमी)

 • अनेक शतकांपासून तेवत ठेवलेली ज्योत - आलमप्रभू

  रामलिंग मंदिरापासूनच या ठिकाणी जायला वाट आहे. या वाटेवरुन जाताना दोन्ही बाजूला झाडी दिसतात. पुढे डाव्या हाताला एक दारी दिसते तिथून कुंथगिरी हे मंदिर खूप छान दिसते. इथे फोटोसेशन खूप छान होते. इथून पूढे उजव्या हाताला वळून सरळ पूढे गेल्यावर आलमप्रभूचे छोटेखाणी मंदिर दिसते. मंदिरात प्रवेश केल्यावर इथे आपणांस मूर्ती दिसत नाही. इथे एक ज्योत दिसते जी जवळपास ७५० वर्षाहूनही अधिक काळ अशीच तेवत आहे. मंदिरात शांतता जाणवते. आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य आहे.  *कसं जायचं- कोल्हापूर शहर- सांगली फाटा - हातकणंगले रोड - रामलिंग मंदिर- आलमप्रभू (२८ किमी)

 • आडवाटेवरचा धूळोबा

  या मंदिराला जाताना एखाद्या छोट्या जंगलातूनच प्रवास केल्यासारखेच वाटते. पावसाळ्यानंतरचा इथला निसर्ग तर अवर्णनियच. तिथून पूढे गेल्यावर एक कमान दिसते. पुढे मंदिराच्या प्रवेश व्दारातून २०-२५ पाय-या चढून मंदिरात गेले की श्री. धुळोबांच दर्शन घेता येते. हे मंदिरसुध्दा निसर्गाच्या कुशीत आहे. छान आहे.

  कसं जायचं - कोल्हापूर शहर- सांगली फाटा - हातकणंगले रोड - रामलिंग मंदिराच्या थोडं अलीकडे उजव्या हातास फाटा - धुळोबा (२८ किमी)

 • कृष्णेच्या तीरी - नरसोबाची वाडी

  हे मंदिर दत्त संप्रदायाच्या मुख्य स्थानांपैकी एक आहे.इथे रोज हजारो भाविक भेट देत असतात. हे मंदिर कोल्हापूरच्या पूर्वेला ४० किमी वर आहे. कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर हे मंदिर म्हणजे क्षेत्र नरसोबाची वाडी होय. इथे नदी घाट असून भक्तांच्या सोईसाठी स्नान व्यवस्था व इतर कार्यांसाठी सोय आहे. इथे महाशिवरात्र व दत्त जयंती यावेळी मोठी यात्रा भरते. महाराष्ट्राबरोबर कर्नाटकातूनसुध्दा मोठ्या प्रमाणावर भाविक इथे भेट देतात. इथे आल्यावर मन प्रसन्न होत. दर्शन घेऊन भक्त तृप्त होतो. या मंदिराच्या घाटावरुन पलिकडे आणखीन एक घाअ दिसतो तो घाट सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या समाधींचा आहे. तिथे भेट देण्यास हरकत नाही.

  कसं जायचं - कोल्हापूर शहर- सांगली फाटा - हातकणंगले - नरसोबावाडी (५० किमी)

 • शिल्पकला व स्थापत्य कलेचा अजोड नमूना - कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर

  खिद्रापूर मधील कोपेश्वर मंदिर तर इतके अप्रतिम आहे की बस्स बोलायला शब्दच उरत नाही. कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राचे वैभव ठरावे ही वास्तवता आजही या मंदिरात आढळते. इथला स्वर्ग मंडप इतर शिल्प कला, कलाकृती खूपच सुंदर आहे. कोल्हापूरात आल्यावर या मंदिराला भेट देणे एक पर्वणी ठरते. मंदिरात कोपेश्वर म्हणजेच महादेवाची पिंड आहे. या मंदिरापासून दोन मिनिटाच्या अंतरावर जैन मंदिर असनू त्यावरची शिल्पकला सुध्दा पाहण्यासारखी आहे. हि मंदिरे पाहणे म्हणजे एक नादखुळा अनुभव आहे. हे मंदिर नरसोबा वाडीपासून २२ किमी वर आहे.


  कसं जायचं - कोल्हापूर शहर- सांगली फाटा– अतिग्रे – अब्दुललाट – सैनिक टाकळी – खिद्रापूर (५९km किमी)

 • आधुनिक पण आकर्षक गणेश मंदिर

  कोल्हापूर पासून ३८ किमी वर जयसिंगपूरमध्ये हे मंदिर आहे. या मंदिराची निर्मिती २०१२ मध्ये पूर्ण झाली. हे मंदिर आत्ताचेच पण फार थोड्या कालावधीत लोकप्रिय झाले आहे. याचे कारण म्हणजे या मंदिराचा आकार याचं बाह्य व अंतर्गत रुप. अतिशय देखणं हे मंदिर असून या मंदिरास एकदा नक्की भेट द्यावी.


  * कसं जायचं - कोल्हापूर शहर - सांगली फाटा - जयसिंगपूर - गणेश मंदिर (४०km किमी)

 • काळभैरी - गडहिंग्लज

  कोल्हापासून ६५ किमी अंतरावरील हे मंदिर त्याच्या शिखरांमुळे सुंदर दिसते. गडहिंग्लजमध्ये हे देवस्थान खुप लोकप्रिय आहे. डोंगराच्या कुशीत हे मंदिर वसले असून समोरच जलाशय दिसतो. इथून पूढे ८ किमी वरील इंचनाळ गावातील प्राचीन गणेश मंदिराला भेट देता येईल.

  *कसं जायचं - कोल्हापूर शहर - निपाणी -तवंदी घाट - काळभैरी - गडहिंग्लज (६५ किमी)

 • प्राचिन गणेश मंदिर, इंचनाळ

  येथिल गणेश मंदिर प्राचीन असून पेशवे काळात जिणोध्दार झालेला आहे. आजही हे मंदिर सुस्थितीत असून नुकताच जिणोध्दार केल्यासारखे वाटते. मंदिर अतिशय देखणं आहे. कर्नाटकातील आरभावी दगडाचा जिर्णोध्दारामध्ये खूप चांगल्या रितीने वापर केलेला आहे. मंदिराच्या समोर छोटेखाणी बाग आहे.

  *कस जायचं - कोल्हापूर शहर -निपाणी - गडहिंग्लज - इंचनाळ ७२ किमी

 • भव्य नंदी , रामतीर्थ

  आजरा तालूक्यापासून एसटी स्टँडपासून ३ किमी अंतरावर असलेल्या रामतीर्थ धबधब्याच्या थोडं अलिकडे डाव्या हाताला महादेवाचं मंदिर लागते. तीथलं वैशिष्ट्य म्हणजे इथला ६ फुट उंचीचा काळ्या पाषाणातील नंदी होय. अतिशय सुबक व सुंदर नक्षीकाम असलेला हा नंदी सर्वांनी आवर्जून पहावा.

  *कसं जायचं - कोल्हापूर शहर निपाणी - आजरा - रामतीर्थ (८६ किमी)

 • आदमापूरचा बाळूमामा

  आदमापूरचा बाळूमामा कोल्हापूर जिल्हयातील लोकप्रिय देवांपैकी एक असून इथे जाण्यासाठी आपणास कोल्हापूरातून कळंबा मार्गे पूढे मुधाळ तिट्ट्यावरुन डाव्या हाताला वळन घेवून जाता येथे कोल्हापूरातून ४० किमी अंतरावर हे मंदिर आहे. पूर्वी असलेल्या या मंदिराचा नुकताच कायापालट झाला आहे. अतिशय प्रशस्त असे मंदिर दिसते. इथे बाळूमामाचे दर्शन घेतल्यानंतर बाहेर येऊन आपण गरमागरम पौष्टीक अशा नाचणीच्या आंबील प्रसादाचा लाभ घेऊ शकतो. तसेच दर रविवारी महाप्रसाद असतो. इथून जवळच असा भक्तनिवाससुध्दा आहे याचा भाविकांना लाभ घेता येईल.

  *कसं जायचं - कोल्हापूर शहर- कळंबा - बिद्गी - मुधाळ तिट्टा - बाळूमामा मंदिर (५० किमी)

 • जगातील सर्वात उंच गणेश प्रतिमा ठरावी अशी चिन्मय गणाधिश

  कोल्हापूर पूणे मार्गावर टोप - संभापूर जवळ एक भव्य अशी गणेश मूर्ती आपले लक्ष खेचून घेते ती मूर्ती म्हणजेच चिन्मय गणाधिश होय. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे याची प्रचंड उंची ही मूर्ती ८५ फुट उंच आहे. मूर्ती सिमेंट काँक्रीटची असून वजन ८०० टन आहे. कोणत्याही कंपनीच्या स्पॉन्सरशिपशिवाय सामान्य जनतेच्या उदार देणग्यातून चिन्मय सेवा ट्रस्ट महाराष्ट्र व्दारा हे भव्य दिव्य कार्य संपन्न होऊन १८ नोव्हेंबर २००१ रोजी मूर्ती दर्शनासाठी खूली करण्यात आली. हजारो पर्यटक ही भव्य दिव्य मूर्ती पाहण्यासाठी येतात. येथून जवळच असलेल्या संभापूर गावातील करवीरकर छ.संभाजी राजे भोसले यांचे समाधी मंदिरही आपण पाहू शकतो.

  *कसं जायचं- मुख्य बसस्थानक - तावडे हॉटेल पासून डावीकडे - पेठवडगांव रोड - टोप - चिन्मय गणेश (१६ किमी)

 • दर्गा

 • शहरांतर्गत हिंदू मुस्लीम एैक्याचे प्रतिक, बाबूजमाल दर्गा

  प्राचीन वास्तू आणि धार्मिक महत्व असणारे हे ठिकाण हिंदू मुस्लीम एैक्याचे प्रतीक आहे. दर्ग्याच्या प्रवेशव्दारावर गणपती दिसतो. हे ठिकाण धार्मिक महत्वाचे असल्याने सर्व धर्मियांचे पर्यटक इथे भेट देतात.


  *कसं जायचं- मुख्य बसस्थानक- गंगावेश – उर्मिला टॉकीज -बाबुजमालदर्गाह (4 किमी)

 • मलिक रेहान दर्गा

  कोल्हापूर पासून ८० किमी वरील ऐतिहासिक विशाळगडावर मलिक रेहान या धर्मगुरुंचा दर्गा आहे. दर्ग्यामध्ये प्रसन्न वातावरण असते. गडावरील दर्ग्याचे स्थान जागृत आहे असे मानले जाते.  कसं जायचं - कोल्हापूर शहर - मलकापूर - पांढरेपाणी-टेंभुर्णेवाडी - गजापूर - विशाळगड (८० किमी)

 • ऐतिहासिक साधोबा

  पन्हाळा गडावर प्रवेश करताच डाव्या बाजूस आपणांस जी भव्य व आकर्षक वास्तू दृष्टीस पडते तोच हजरत पीर साधोबा दर्गाह. इ.स. १६१२ मध्ये अदील शहाच्या कारकिर्दीत हा दर्गा बांधला गेला. २९ फुट लांब आणि २९ फुअ रुंद, ५० फुट उंच अशी या दर्ग्याची रचना आहे. दर्ग्याचे बांधकाम संपूर्णपणे चुन्यामध्ये केले असून वरील बाजूस देखणा असा गोल घुमट आहे. इस्लामिक कॅलेंडरप्रमाणे रज्जब महिन्यांच्या २४ तारखेला येथील सर्व धार्मिक भाविक मोठ्या उत्साहात उरुस साजरा करतात.  *कसं जायचं - कोल्हापूर शहर - वाघबीळ फाटा- पन्हाळा प्रवेश - साधोबा दर्गा (23 किमी)

 • चर्च

 • उत्तम स्थापत्त शैलीचा ऑल सेंट चर्च

  कोल्हापूर शहरातील हेड पोस्ट ऑफिस समोर असलेले हे चर्च अतिशय लक्षवेधक आहे. काळ्या दगडांचा चर्चच्या बांधणीमध्ये अतिशय चांगला वापर केला आहे. आतमध्ये प्रवेश करताच आतील बेंचेसच्या वैशिष्टपूर्ण रचना येथे दिसते. तसेच काचेवरील येशू ख्रिस्तांचे चित्र इतके सुंदर आहे की पाहतच बसावे असे वाटते. अतिशय देखणी अशी ही वास्तू पाहण्याजोगी आहे.

  *कसं जायचं - मुख्य एसटी स्टँड - ताराराणी चौक - रेसिडन्सी क्लबच्या शेजारी - ऑल सेंट चर्च (२.५ किमी)

 • वायल्डर मेमोरियल चर्च

  sample text sample text sample text sample text sample text sample text sample text sample text sample text sample text sample text sample text sample text sample text


  *कसं जायचं -

 • जैन मंदिरे

 • भव्य कलाकुसरीचा नगारखाना, लक्ष्मीसेन जैन मठ

  शुक्रवार पेठेतील लक्ष्मीसेन जैन मठाच्या नगारखान्याची भव्यता व त्यावरील कलाकुसर पाहिल्यावर कोणालाही भारावून जायला होतं. जवळपास १०० वर्षापूर्वी मठाधीपती लक्ष्मीसेन महाराजांनी ६१ हजार रुपये खर्चून हा नगारखाना बांधला. जवळपास ६० फुट उंचीचा हा नगारखाना आहे. या मठात जैन धर्माचा इतिहास, साहित्य, पुरातन धर्मग्रंथ विविध रुपातील मूर्तीच जतन झालं. मठाच्या आवारात अखंड पाषाणातील मानस्तंभ असून त्याच्या चारही बाजूवरील कोरीवकाम जबरदस्त आहे. त्याचबरोबर या मानस्तंभाजवळच तीर्थंनकारांची ९ मीटर उंच उभी मुर्ती आहे. या मठातील परिसर शांत व मन प्रसन्न करणार आहे. या मठाच्या नगारखान्याची भव्यता व येथील मनप्रसन्न करणारी शांतता अनुभवण्यासाठी इथे एकदा नक्कीच भेट द्यायला हवी.

  *कसं जायचं - मुख्य बस स्थानक - दसरा चौक - शुक्रवार पेठ - लक्ष्मीसेन जैन मठ (पिवळावाडा) (३.५ किमी)

 • रुपनारायण जैन मंदिर

  कोल्हापूर शहरातील महाव्दार रोडपासून थोड्याच अंतरावर रुपनारायण जैन मंदिर आहे. गंडरादित्याच्या राजा सामंत निंब देवरस यांनी सन ११००च्या काळात जैन विहार वास्तू बांधली. अर्धमंडप, सभा मंडप, अंतराळ व गर्भगृह असे मंदिराचे ४ भाग आहेत. सभा मंडपातले खांब दोन्ही हाताच्या घे-यात मावणार नाहीत एवढे मोठे आहेत. याच खांबावर मंदिराचे छत उभारले आहे. मंदिरात पार्श्वनाथ तीर्थणकरांची उभी मूर्ती आहे. मंदिरासमोर प्राचीन शिलालेख, मानस्तंभ व आजूबाजूला शिल्पे तसेच काही मुर्त्या दिसतात.  *कसं जायचं- मुख्य मध्यवर्ती बस स्थानक- छ. शिवाजी चौक, महाव्दार रोड- रुपनारायण मंदिर (३.५ किमी)

 • हिल टॉप टेंपल, बाहुबली

  जैन धर्मियांचे श्रध्दास्थान असलेले बाहुबली मंदिर कोल्हापूर पासून३० किमी अंतरावर हातकणंगले तालूक्यात कुंभोज या गावी आहे. बाहूबली हे क्षेत्र लोकप्रिय धार्मिक स्थळ असून अनेक पर्यटक येथे न चुकता भेट देतात. येथे आदिनाथ, श्री चंद्गप्रभू व श्री. शांतीनाथ यांची प्राचिन जैन मंदिरे आहेत. पाय-या चढून वर गेल्यवर तिथून जो काही परिसर दिसतो तो केवळ विलोभनीच. मंदिर परिसरातच भाविकांसाठी एक छोटीशी बाग तयार केलेली आहे. या मंदिराला भेट दिल्यानंतर एक प्रकारचे समाधान वाटते.  कस जायचं - कोल्हापूर शहर- सांगली फाटा - हातकणंगले - कुंभोज - बाहुबली ३० किमी

 • कुंथुगिरी

  कोल्हापूरच्या पूर्वेला फक्त २१ किमी अंतरावर कुंथुगिरी देवस्थान आहे. या देवस्थानचे वेगळे असे स्थान आहे. मंदिर भव्य असून सर्वत्र स्वच्छता दिसते. त्यामुळे एक प्रकारचे शांत आणि प्रसन्न वातावरण येथे अनुभवायला मिळते. इथे एक विपशन्या केंद्ग आहे. हे मंदिर पाहिल्यानंतर पुढे आपणांस धुळोबा, रामलिंग आणि आलमप्रभू हि मंदिरे पाहता येतात.
  * कसं जायचं - कोल्हापूर - सांगली फाटा - कुंथुगिरी (२६ किमी)

 • उत्कृष्ठ वास्तू शिल्पाचा नमूना जैन मंदिर, खिद्गापूर

  प्रसिध्द कोपेश्वर मंदिरराला जाताना त्याच्या थोडे अलिकडेच हे जैन मंदिर आहे. या मंदिरामध्येही उत्कृष्ट वास्तू शिल्पकला पघायला मिळते. तसेच मंदिराचा आवार छान असून मंदिरामध्ये गारवा जाणवतो. या मंदिराचा शिखरसुध्दा सुंदर असून त्यावर जाण्यासाठी जिना आहे. मंदिरासमोरील मानस्तंभसुध्दा देखणा आहे.

  *कसं जायचं - कोल्हापूर शहर - सांगली फाटा – अतिग्रे – अब्दुललाट – सैनिक टाकळी - जैन मंदिर (५८ किमी)