अभयारण्ये/जंगल

अभयारण्ये/जंगल

अभयारण्ये/जंगल

 • दाजीपूर गवा अभयारण्य, राधानगरी

  कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपुरचे गवा अभयारण्य हे एक पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. 'गवारेडा' या वैशिष्ट्यपूर्ण जनावरासाठी या अरण्याची महाराष्ट्रात ख्याती आहे. या अरण्यात गव्यांचा कळपच्या कळप आढळतो. छत्रपती शाहु महाराजांनी शिकारीसाठी राखून ठेवलेल्या या जंगलाचे पूढे दाजीपूर गवा अभयारण्यात रुपांतर करण्यात आले. दाजीपूर अभयारण्यामध्ये राधानगरी धरण व काळम्मावाडी धरणाचे पाणलोट क्षेत्र येत असल्याने या भागातील जंगल अतिशय घनदाट बनले आहे. विलोभनीय निसर्गसौंदर्य, थंडगार हवामान, अनेक दुर्मिळ पशुपक्ष्यांचे वास्तव्य व कमालिची निरव शांतता या सर्वांमुळे दाजीपूरचे जंगल वेगळे ठरते.

  कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेस असणा-या राधानगरी अभयारण्याचा परिसर ३५१ चौ.किमी असून पर्यटकांसाठी दाजीपूर पासून २२ किमी अंतराच्या गाडीमार्ग जंगलभ्रमंतीसाठी उपलब्ध आहे. बायसन टॉवर, सांबर कोंड, वाघाचे पाणी अशा ठळक ठिकाणी मनोरे उभारण्यात आलेले आहेत.

  या अभयारण्यात फुलपाखरांच्या १२१ प्रजातींची नोंद झाली आहे. त्यामध्ये 'सदन बर्डविंग' हे भारतातील सर्वांत मोठे फुल पाखरु (१९० मी.मी.) असून ग्रास ज्युवेल हे सर्वात लहान फुलपाखरु (१५ मी.मी.) ही दोन्ही फुलपाखरे राधानगरी अभयारण्यात आढळतात.

  राधानगरी अभयारण्यात ३३ प्रजातींच्या, सापांची नोंद करण्यात आली आहे. पाईड बेली शिल्डटेल, ऑलिव्ह फॉरेस्ट स्नेक इत्यादी जातीचे बेडुक, पाली, साप सुरळी, सरडे इथे आढळतात. पक्षी निरीक्षकांसाठी राधानगरी अभयारण्य एक सुवर्णखाणच आहे. २३५ पक्षी प्रजातींची नोंद झाली आहे. यामध्ये निलगिरी वुड पिजन, मलबार पाईड हॉर्नबील, ग्रेट पाईड हॉर्नबील, गिधाडे इत्यादींचा समावेश होतो. राधानगरी अभयारण्यात ३५ प्रकारच्या वन्य प्राण्यांची नोंद झाली आहे. यामध्ये गवा, रानकुत्रा, अस्वल, रानडुक्कर, खवले मांजर, उदमांजर, शेकरु तसेच पट्टेरी वाघ, बिबळ्या इत्यादींचा समावेश होतो. निसर्ग सौंदर्याने संपन्न असे दाजीपूरचे जंगल हे राधानगरी अभयारण्याचाच एक भाग आहे. अशा या जैव विविधतेने नटलेल्या संपन्न अशा दाजीपूर गवा अभयारण्यास भेट देणे म्हणजे पर्वणी ठरते.

  टीप -
  १) दाजीपूर गवा अभयारण्य १५ जुन ते १५ सप्टेंबर या कालावधीत पर्यटकांसाठी बंद असते.
  २) तिकीट विक्री सकाळी ७ ते दुपारी २.३० वाजेपर्यंतच.
  ३) दर मंगळवारी बंद.
  ४) मुक्कामांसाठी एमटीडीसीची तंबु निवासाची व जेवणाची सोय आहे तसेच राधानगरी येथेही रहायची व जेवणाची सोय आहे.
  ५) फोन नंबर ०२३१-२५४२७६६

  *कसं जायचं - कोल्हापूर शहर - राधानगरी - दाजीपूर अभयारण्य (८० किमी)

 • चांदोली अभयारण्य, चांदोली

  चांदोली अभयारण्य कोल्हापूर, सांगली, सातारा व रत्नागीरी या चार जिल्ह्याच्या सदहद्दीवरील परिसरात वसले आहे. कोल्हापूर शहरातून १०० किमी अंतरावरील हे अभयारण्य ३१७.६७ चौ.किमी क्षेत्रात पसरलेले असून हा भारतातील महत्वाचा प्रकल्प आहे तसेच येथे समृध्द अशी जैवविविधता आढळते.

  वाघांचा वावर असलेल्या या परिसरात व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषीत करण्याबरोबरच युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. विविध प्रकारची झाडे, औषधी वनस्पती, वृक्षवेली, विविध प्राणी या सर्वांमुळे चांदोलीचे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. या अभयारण्यात गवा, सांबर, गेळा, अस्वल, तरस, भेकर, साळिंदर, खवले मांजर, रानकुत्रा, रानडुक्कर, कोल्हा असे विविध प्राणी तर रानकोंबडे, घार, घुबड, मोर, गरुड असे विविध पक्षी तसेच येथील जंगलात आंबा, जांभूळ, फणस, हिरडा, आवळा, कडूलिंब यासारख्या वनस्पती व औषधी वनस्पतीही आढळतात.

  चांदोली धरणांमुळे तयार झालेल्या अथांग वसंतसागर जलाशयाच्या आजुबाजूने चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार आहे. या जंगल क्षेत्रातील पुनर्वसन झाल्यामुळे व मानवी हस्तक्षेप नसल्याने येथील वन्यप्राण्यांना संरक्षण प्राप्त झालेले आहे. राज्यातले निर्मनुष्य असणारे हे सर्वात मोठे अभयारण्य आहे.

  निमसदाहरित जंगल प्रकारात येणा-या या जंगलाचा परिसर घनदाट झाडी, गवताळ माळ आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे जांभा खडकाचे विस्तीर्ण सडे यांने समृध्द आहे. सुयोग्य अशा अधिवासामुळे या ठिकाणी अनेक प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, उभयचर, सरीसर्प आणि फुलपाखरे पहावयास मिळतात.

  १९८५ साली महाराष्ट्र शासनाने चांदोली अभयारण्याची स्थापना केली. १४ मे २००४ रोजी याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला असून महाराष्ट्रातील हे सहावे राष्ट्रीय उद्यान आहे. तर अशा या चांदोली अभयारण्याला भेट द्यायलाच हवी.

  *टीप –
  १) चांदोली अभयारण्याच्याच्या प्रवेश तिकीटासाठी मांदुर येथील फॉरेस्ट कार्यालयात संपर्क साधावा फोन क्रं. ०२३४५ - २२६३१८
  २) दार सोमवारी बंद
  ३) फक्त चारचाकी वाहणांनाच प्रवेश

  *कसं जायचं - कोल्हापूर शहर - बांबवडे - कोकरुड - शेंडगेवाडी - मांदुर चांदोली अभयारण्य(१००km)